Saturday, December 29, 2018

रूपगर्विता

सलज्ज सालस
स्पर्शबावरी
मोहक रेखीव
मुग्ध लाजरी

मदिर, पुष्ट परी 
गात्र सुकोमल
रुळे पाठीवर
कभोर कुंतल

अधर विलगती
मिटती नाजूक   
शतनयनांचे
झेलीत कौतुक

रूपगर्विता
सम्राज्ञी ती
नयन मृगापरी
सावध फिरती

कटाक्ष पडता
एक परंतु
चोरटाच कुणी
रचता सेतू

झुकती डोळे
लवे पापणी
कोण उतरले
हृदय अंगणी ?

कवी: प्रसन्न शेंबेकर

Friday, December 28, 2018
नदी जशी आटत जाते

नदी जशी आटत जाते

उघडे पडत जातात घाट
कुत्र्याचे मरतुकडे पिल्लू
कोरड्या पात्रात फिरे मोकाट

टिचलेल्या बांगड्या तळाशी
गुळगुळीत गोटे शेवाळलेले
एखाद दुसरे चिल्लर नाणे
कापड विटके .. विटाळलेले

नदी जशी आटत जाते
झाडांच्या सावल्या हेलकावत नाहीत
दिगंतराची पाखरे पुन्हा
विसाव्याला येत नाहीत

नदी जशी आटत जाते
डोह होत जातात नग्न
वस्त्रावाचून जसा भासे
शालीनतेचा देह भग्न

---- प्रसन्न शेंबेकर

Friday, November 23, 2018

नाही कळले कुणास 

नाही कळले कुणास
पंख नभाचे मिळाले
कधी फुलपाखरास
नाही कळले कुणास 
कोजागिरीच्या कुशीत
जाग आली शिशिरास
नाही कळले कुणास
पिकलेल्या डाळींबास
लागे पाखरांची आस
नाही कळले कुणास
कळ्या वेचता वेचता
कसा दरवळे श्वास
नाही कळले कुणास
कधी कळो ही न यावे
कुणी वेचले कुणास
-------- प्रसन्न शेंबेकर

Wednesday, April 18, 2018

बाई 

एकटी दुकटी रातच्याला फिरू नकोस बाई
आजकाल अंधाराचा काही नेम नाही

अंधाराला हजार जिभा हात केसाळ काळे
दबा धरून बसले आहेत वखवखलेले डोळे

अंधार आहे वासनांचा आदिम जहरी फुत्कार
अंधार आहे अहंकारी पौरुषाचा विखार

अंधाराला आई बहीण नाती कळत नाहीत
बाई असते भोगण्यासाठी, एवढंच त्याला माहीत

म्हातारी अस, तरूण अस किंवा कोवळी पोर
बाईपण म्हणजे उभ्या आयुष्याचा घोर

झपाझपा चाल बाई मागे येतोय अंधार
मागे पुढे नाही तुला कोणाचाही आधार

जपून रहा! अंधार तुझ्या घरातसुद्धा असेल
खाटेखाली लपलेल्या नागासारखा डसेल

एकटी दुकटी रातच्याला कुठे जाशील सांग ?
रान भरलंय लांडग्यांनी, घरात दडलाय नाग !

------
प्रसन्न शेंबेकरSaturday, March 08, 2014

      स्त्री

स्त्री ह्या शब्दातच
आहे जोडाक्षर
विश्व आणि घर
जोडणारे

स्त्री ह्या शब्दातच
आहे ना वेलांटी
देई अनुभुती
सौंदर्याची

स्त्री ह्या शब्दामध्ये
दिसेनासे दु:ख
राहतसे मूक
तिच्या ओठी

Monday, July 15, 2013

"तोच"

टेबलावर त्याचे मोठे मनगटी घड्याळ
बेपर्वाईने काढून फेकलेले शूज कोपऱ्यात
त्याचे स्लॅमबूक, महागडं पेन आणि ड्रॉवरच्या आतलं परफ्यूम
तो मोठा झाल्याची साक्ष देत आहेत...
शोकेसवरचा त्याचा बालपणीचा फोटो
कोपऱ्यातलं टेडी बिअर आणि काही खेळणी जुनी सांगताहेत
त्याच्या आत एक लहान मूल आहे.
मला दोघांनाही सांभाळायचंय
कारण त्याच्या डेस्कवरचा बाबांचा फोटॊ
तोच आहे अजूनही... तसाच.....

प्रसन्न शेंबेकर 

Wednesday, May 08, 2013


उंबरठा

घरांना उंबरठेच राहिले नाहीत
मुली तिन्हीसांजेला बाहेर जाताना थबकतील कुठे ?
कुठे विसावतील शिणून घरी आलेली कर्ती माणसं ?
निरोपाचे हात हलत नाहीत घरच्यांसाठी
आणि आगंतुकांना मात्र सरळ आत घेतात घरं

उंबरठा नाही, ठेच नाही, पुढच्याचं शहाणपण मागच्या पर्यंत पोहचत नाही
घरं आता रस्त्यावर आली आहेत
की रस्तेच शिरत आहेत थेट घरात ?
कळत नाही !

एक दिवा दारापाशी जळायचा आधी
डोळ्यात तेल घालून
आता उंबरठाच नाही ... म्हणून
दिवाही जळत नाही !

----------------------------  प्रसन्न शेंबेकर