Thursday, August 30, 2007


मी जसा भेटतो : गझल


मी जसा भेटतो तसा आहे
आतबाहेर आरसा आहे

होतसे राख जो जळे त्याची
काय आयुष्य कोळसा आहे ?

मी पिढीजात सोसतो दु:खे
वेदनेचाच वारसा आहे

आपुला दोष ना दिसे कोठे
हा तुझा दोष, माणसा, आहे

काय माझ्यात पाहिले तेव्हा
(हा तुझा प्रश्नही कसा आहे?)



Saturday, August 25, 2007


पंढरीची वाट
चालती पाउले
धन्य धन्य बोले
पायधूळ

हजारो मुखांनी
गर्जे पुंडलिक
देवालाही सुख
साह्ववेना

उभा कटेवरी
ठेवूनीया हात
व्याकूळ साक्षात
पांडुरंग