Showing posts with label मी जसा भेटतो : गझल. Show all posts
Showing posts with label मी जसा भेटतो : गझल. Show all posts

Thursday, August 30, 2007


मी जसा भेटतो : गझल


मी जसा भेटतो तसा आहे
आतबाहेर आरसा आहे

होतसे राख जो जळे त्याची
काय आयुष्य कोळसा आहे ?

मी पिढीजात सोसतो दु:खे
वेदनेचाच वारसा आहे

आपुला दोष ना दिसे कोठे
हा तुझा दोष, माणसा, आहे

काय माझ्यात पाहिले तेव्हा
(हा तुझा प्रश्नही कसा आहे?)