Wednesday, April 18, 2018

बाई 

एकटी दुकटी रातच्याला फिरू नकोस बाई
आजकाल अंधाराचा काही नेम नाही

अंधाराला हजार जिभा हात केसाळ काळे
दबा धरून बसले आहेत वखवखलेले डोळे

अंधार आहे वासनांचा आदिम जहरी फुत्कार
अंधार आहे अहंकारी पौरुषाचा विखार

अंधाराला आई बहीण नाती कळत नाहीत
बाई असते भोगण्यासाठी, एवढंच त्याला माहीत

म्हातारी अस, तरूण अस किंवा कोवळी पोर
बाईपण म्हणजे उभ्या आयुष्याचा घोर

झपाझपा चाल बाई मागे येतोय अंधार
मागे पुढे नाही तुला कोणाचाही आधार

जपून रहा! अंधार तुझ्या घरातसुद्धा असेल
खाटेखाली लपलेल्या नागासारखा डसेल

एकटी दुकटी रातच्याला कुठे जाशील सांग ?
रान भरलंय लांडग्यांनी, घरात दडलाय नाग !

------
प्रसन्न शेंबेकर



Saturday, March 08, 2014

      स्त्री

स्त्री ह्या शब्दातच
आहे जोडाक्षर
विश्व आणि घर
जोडणारे

स्त्री ह्या शब्दातच
आहे ना वेलांटी
देई अनुभुती
सौंदर्याची

स्त्री ह्या शब्दामध्ये
दिसेनासे दु:ख
राहतसे मूक
तिच्या ओठी

Monday, July 15, 2013

"तोच"

टेबलावर त्याचे मोठे मनगटी घड्याळ
बेपर्वाईने काढून फेकलेले शूज कोपऱ्यात
त्याचे स्लॅमबूक, महागडं पेन आणि ड्रॉवरच्या आतलं परफ्यूम
तो मोठा झाल्याची साक्ष देत आहेत...
शोकेसवरचा त्याचा बालपणीचा फोटो
कोपऱ्यातलं टेडी बिअर आणि काही खेळणी जुनी सांगताहेत
त्याच्या आत एक लहान मूल आहे.
मला दोघांनाही सांभाळायचंय
कारण त्याच्या डेस्कवरचा बाबांचा फोटॊ
तोच आहे अजूनही... तसाच.....

प्रसन्न शेंबेकर 

Wednesday, May 08, 2013


उंबरठा

घरांना उंबरठेच राहिले नाहीत
मुली तिन्हीसांजेला बाहेर जाताना थबकतील कुठे ?
कुठे विसावतील शिणून घरी आलेली कर्ती माणसं ?
निरोपाचे हात हलत नाहीत घरच्यांसाठी
आणि आगंतुकांना मात्र सरळ आत घेतात घरं

उंबरठा नाही, ठेच नाही, पुढच्याचं शहाणपण मागच्या पर्यंत पोहचत नाही
घरं आता रस्त्यावर आली आहेत
की रस्तेच शिरत आहेत थेट घरात ?
कळत नाही !

एक दिवा दारापाशी जळायचा आधी
डोळ्यात तेल घालून
आता उंबरठाच नाही ... म्हणून
दिवाही जळत नाही !

----------------------------  प्रसन्न शेंबेकर

Tuesday, August 07, 2012

पाऊसस्पर्श

पाऊसस्पर्श

पाऊस झिरपतो मातीमध्ये मुरतो
साजणासारखा सतत मनातच झुरतो
उलटून रात्रीचे प्रहर, उजाडे तेव्हा
तो आठवणींपरी वेलीवाती उरतो

पाऊस बरसतो, बरसत राही मंद
पाऊस पसरतो वाऱ्यामधुनी कुंद
पाऊस नभाचा आशिर्वाद भूईला
तो जिथे स्पर्शतो... तिथे उमलतो गंध  

Saturday, December 10, 2011

मित्र

मित्र जेव्हा खूप वर्षांनी भेटतात
जिथे झाली असते शेवटची भेट
तिथून पुढे सुरु होते मैत्री.. . थेट

मित्र नावाने हाक मारत नाहीत
पाळण्यातल्या गोंडस नावाला झोके देत नाहीत
पक्या, विक्या, राम्या , शाम्या
ते तुमच्या "स्टेटस"ला भीक घालत नाहीत

जुनी भांडणं उकरून काढतात
पण फक्त एक आठवण म्हणून
"तुला ती एक आवडायची नं रे कॉलेजात?"
बायकोसमोरच विचारतात हसून

मित्र काही बोलतातच असं नाही
पाण्यात खडे मारत बसतील तासन तास
सिनेमाची तिकिटं काढून म्हणतील
"चल नं बे, थोडा टाईमपास"

मात्र आपल्या कठीण प्रसंगात
कधी बघावं मागे वळून
मित्र उभे असतील तिथे
मूकपणे, खांद्याला खांदा लावून ...

Saturday, October 23, 2010

 दिठींचा उत्सव

पाल्यापाचोळ्याखालून जसे झुळझुळे पाणी
किर्र हिरव्या राईत जशी पारव्यांची गाणी
जशी पहाट उन्हाची सोनकोवळी पैंजणे
जसे शारदचंद्राचे दूधकेशरी चांदणे
जसा नितळ नभात फिरे कापसाळी ढग
झडलागल्या दुपारी जसे आळसावे जग
ऐन उन्हाळ्यात जसा ओल्या वाळ्याचा सुवास
जशी हळूवार होई लाट भेटता तटास

तशी तुझी माझी प्रीत दोन दिठींचा उत्सव
फुले फुलती अबोल, उरे पानांवरी दव

Saturday, August 21, 2010


पंख फुटले पिलांना
दिशा धुंडाळती दाही
साद घालते घरटे
त्याला प्रतिसाद नाही

पिले हिंडती मोकाट
घेती पंखात आभाळ
नाही घरट्याची कुठे
सय जराही ओढाळ

पिले कोवळ्या वयात
आता लागली उडाया
त्यांच्या रक्तात रुजेना
वृक्ष वल्लरींची माया

दु:ख घरट्यांना नाही
पिले उडून जाण्याचे
पिले तशीच उडाली
काय करावे गाण्यांचे ?

Tuesday, February 02, 2010


दरवळतो अजुन गंध पारिजातकाचा
अंगणात अजुन बहर कालच्या फुलांचा

अजुन तेच चंद्रप्रहर, त्याच चांदराती
उजळतात अजुन उरी लक्ष लक्ष ज्योती
अजुन कधी स्मरणपथी वादळ ते भेटे
अन क्षणात तनमनात वडवानल पेटे
आठवतो क्षण क्षण ह्या धुंद मीलनाचा
दरवळतो अजुन गंध पारिजातकाचा

दरवळतो अजुन गंध पारिजातकाचा
पण आता राहिला न स्पर्श तो सुखाचा
वठला तो वृक्ष पान पान गळुन गेले
वणव्यातच सर्व रान रान जळुन गेले
उरल्या त्या आठवणी मुग्ध बहरण्याच्या
अन दवात भिजत भिजत हळुच उमलण्याच्या
आसपास होई भास त्याच पावलांचा
दरवळतो अजुन गंध पारिजातकाचा

Friday, May 01, 2009


मौन नाझ्या सोबतीने पाळ्ते
हे शहर माझी व्यथा सांभाळते

ती उखाणा घेत नाही, हासते
हासुनी ती नाव माझे टाळते

मी तिची नि:शब्दताही ऐकतो
पत्र ती घाईत माझे चाळते

लोपले पावित्र्य दीपांचे, पहा!
देशद्रोह्यांना प्रजा ओवाळते


पोळलो मी, भाजलो आजन्म मी
ही चिता आहे बरी की ,जाळते


दु:ख ओलांडून जाती माणसे
कोण येथे व्यर्थ अश्रू ढाळते
?

रात्र भासे ही मला तुजसारखी

चांदणे वेणीत जेव्हा माळते

Tuesday, March 24, 2009


पाहतॊ श्वासात कोठे लागतो काही सुगावा
काल् तू होतीस ह्याचा शोधतो आहे पुरावा

अंगणापर्यंत माझ्या आसवांची रेष जाते
(काय माझा चंद्र गेला ह्याच वाटेने असावा? )

ही दुहेरी रीत एका माणसाला शोभते का ?
"जाउ दे ना" ही म्हणावे हात ही हाती धरावा

तु म्हणालीस "माग ना रे तू, मला सोडून काही"
आरसा बघशील तेव्हा चेहरा माझा दिसावा !

काय अंधारून आले माझीया प्राणांसभोती
भास् आहे की तुझ्या घनदाट छायेचा विसावा ?

लागलॊ जेव्हा जळाया यातना झाल्या न काही
पोसले आजन्म ज्याला , देह हा माझा नसावा

Monday, January 05, 2009



कवी जागोजागी कवी ब्लॉगो ब्लॉगी
कवी वृत्तहीन, कवी ग-ल गा-गी
कवी शिकावू, कवी दिखावू
कवी उबावू कवी विकावू

कवी सम्मेलन वाले , सामाजिक वाले
कवी शबनम वाले, दाढीवाले , ताडी वाले
कवी गाऊन म्हणणेवाले, पेप्रात छापणे वाले
कवी भाषांतरी , कवी कविताच ढापणेवाले

कवी राजकीय, विद्रोही ... संतप्त , आक्रमक काही
कवी शब्दिक गोड गुलाबी श्रुंगारिक मुक्त प्रवाही

कवी उदंड झाले परंतु एखादाच
शब्दात मांडतो सुखदु:खांचा नाच
तो नसून असतो, असून नसल्यावाणी
सम्राट नभाचा. . पृथ्वीवर अनवाणी

Friday, December 19, 2008

उखाणा घे पोरी
म्हणतात सारे
उडतात घरभर
हास्याचे फवारे

उखाणा घेताना
डोळा आले पाणी
सनईच्या मांगल्याच्या
मुळाशी विराणी

जुळवून शब्द
घ्यायचेच नाव
आले माझ्या जीवनात
कोणीतरी राव

उखाणा घे पोरी
तुझे तरी काय ?
कुठेतरी निजायची
पाहिजेच सोय

Tuesday, September 02, 2008


पुर्णत्व

कधी पेटवताना निरांजनातिल वाती
किती जपतो आपण, ओंजळ करतो भवती
झुळुकही जराशी थोपवितॊ हाताने
अन घेतॊ काढून, पुर्ण उजळल्यावरती

एकदा उजळली पुर्णत्वाने ज्योती
की नसते तिजला वाऱ्याचीही भीती
ती स्वत: जळते आणि उजळते इतरा
मग तेच जोडतॊ हात , नी लवतो पुढती
. . . . . . . . . . . . . . . . . . . . .

Wednesday, June 04, 2008


निमिषाचे कवी आम्ही , निमिषाचे बुद्ध ।
मग उरे तगमग, जाणविता शुद्ध ।
लौकिकाच्या कोळशात अलैकिक हिरा ।
चकाकतो तेवढाच .. बाकीचा ढिगारा ।
लोक म्हणे तुम्ही कसे धरिला हा पंथ ।
कवी काजव्याचा दिवा . . . सुर्य तिथे संत ।
काजव्याचे क्षणिकत्व किती लपेटावे ?
सुर्य व्हावे ... आता सारे अस्तित्व पेटावे !!

Wednesday, May 21, 2008



पाकळी पाकळी मी. . .
जपणार आता किती ?
तुझ्या स्पर्शांची ओढ मला
तुझ्या स्पर्शांची वाटे भीती !

वाटते की हा गंधकोष माझा . . लुटशील का रे तू ?
भ्रमर हो‌ऊन माझ्याच मिठीत . . मिटशील का रे तू ?
तुझ्या मिटण्याची ओढ मला . . .
तुझ्या लुटण्याची वाटॆ भीती


वाटते की मला वेचून घेशील. . . ऐन पहाटेस तू
दवाचे मोतीही टिपून घेशील . . राजहंस आहेस तू
भय रात्रीचे नाही मला. .
पहाटेचीच वाटे भीती

स्पर्शताच तुझ्या तेजस हातांनी , उमलून ये‌ईन मी
तुझ्यासाठी रात्र सोसली काट्या्त . .तुझीच हो‌ईन मी
फूल होण्याची ओढ मला . . .
कळी नसण्याची वाटे भीती !

पाकळी पाकळी मी . . . . . . . . . . .

Saturday, February 16, 2008


पावसाची पावलं कधी अलगद उमटतात काचेवर
कधी उन्हाची दुपार लवंडलेली सावलीच्या पारावर
कधी शिशिरात पानगळीची धुरकट संध्याकाळ
वसंत फुटून फुलताना कधी गंधमोहोर वाऱयावर

कधी काहीच कुठेच नसल्य़ाची भावहीन शुन्यता अऩ
नेमकी माणसे वाटेत भेटुन हातात हात घेत बोलणारी
सर्वव्यापकतेची क्षणात दिपवून जाणारी अंतर्जाण
तोच ..प्रेतेयात्रा रस्त्यावरून अचानक फुले मागे उधळत जाणारी

काय आहे हे? कळत नाही.. क्षणोक्षणी बदलणारे काहीसे ?
सावल्यांच्या मायाजाळातून जसे हलत रहावेत कवडसे

जगणे इतके अतर्क्य, अगम्य .. अमर्याद.. अनुभवांचे अंतराळ
की कविता लिहिताना ही माझी लेखणीही ब्रह्म होते
शब्द उतरतात थेट कुणा अज्ञात सम्राटाच्या पालखीतून
मी मात्र भोई .. पायांजवळची माझी सही नम्र असते.





Saturday, January 12, 2008


ओळखू नये मज कोणी
मी इतके सरळ जगावे
असुनही ...कुठेच नसावे

गर्दीत असावा मेंदू
मेंदूत नसावी गर्दी
मी एकांताचा दर्दी

अस्तित्व करावे लागे
का सिद्ध, कळे ना मजला
इतरांची सा्क्ष कशाला ?

Thursday, August 30, 2007


मी जसा भेटतो : गझल


मी जसा भेटतो तसा आहे
आतबाहेर आरसा आहे

होतसे राख जो जळे त्याची
काय आयुष्य कोळसा आहे ?

मी पिढीजात सोसतो दु:खे
वेदनेचाच वारसा आहे

आपुला दोष ना दिसे कोठे
हा तुझा दोष, माणसा, आहे

काय माझ्यात पाहिले तेव्हा
(हा तुझा प्रश्नही कसा आहे?)



Saturday, August 25, 2007


पंढरीची वाट
चालती पाउले
धन्य धन्य बोले
पायधूळ

हजारो मुखांनी
गर्जे पुंडलिक
देवालाही सुख
साह्ववेना

उभा कटेवरी
ठेवूनीया हात
व्याकूळ साक्षात
पांडुरंग