Wednesday, March 28, 2007














गुड माँर्निंग

गुड माँर्निंग म्हणत येते माझ्या दारी सकाळ
तिचे केस भुरभुर उडत झाकीत असतात कपाळ
मोहक तिच्या अस्तित्वाची निरखीत कलाकुसर
चाचपडतच बंद करतो कोनाडयातला गजर

उठतो जोडत मनातल्याच देवापुढती हात
गिझर करतो ओँन यंत्रवत घासत घासत दात
थोरल्याला मग आधी लाडिक , नंतर बाप-स्टाईल
हाक देतो " उठा आता, नाहितर बस जाईल"

दार उघडतो, उजाडलेले असते अंधूक अंधूक
पेपरवाला येतो ऐटीत, फेकतो पेपर अचूक
पदर खोचून येते बायको, बोलू लागतात भांडी
थोरला मागतो टाय, धाकला उठून मागतो मांडी

बस येते , थोरला जातो , धाकला करतो गाई
चहा पीत अंगणात बसतो , दोघेच क्षण काही
शब्दच गुंफतो वेळ नसतोच गुंफायाला बोटे
घडयाळ आपले उगारूनच उभे असते काटे

सकाळ अशी रोजच पण चहा, अंगण, दोघे
याहुन वेग़ळे काय असते कविता करण्याजोगे?

दि। 28 मार्च 2007