Sunday, December 03, 2006


अत्तरांचे किती प्रकार
घेऊन आला तो विकायला !
( कसा सुगंधाचाही आधार
घेतात माणसे जगायला ! )

गंधागंधांचे तलम पदर
तो उलगडून दाखवताना
मी थक्क ! किती अर्थ असतात
फुलांच्या गोठलेल्याही श्वासांना ?

न राहवून मी विचारलेच
कशी उमलली तुझ्यात ही कला ?
तो निर्विकार! "नोकरी सुटली साहेब
पण संसार तर चालवलाच पाहिजे मला !"
------

Monday, November 27, 2006


घायाळ परतला योद्धा
वेशीवर जाऊ नको तू
दु:खांना रक्तापेक्षा
अश्रूंची किंमत आहे

रडणारया डोळयांमागे
हसणारे ऊर लपू दे
तुटलेले खड्गच त्याला
घावाहून बोचत आहे

देहावर पांघरलेला
राहू दे तसा तो शेला
ती त्याच्या शर्थखुणांची
उरलेली दौलत आहे
-------------

Friday, November 24, 2006


सलेल काटा
तिथेच ठेवा
फूल खुणेचे
एक गुलाबी

निदान मागुन
येणारयांना
तरी, मिळावा
स्पर्श सुखाचा …













तू ये ना , मन आज अनावर माझे
तुझ्या स्मृतींचे गंध अजुनही ताजे

संध्याकाळी , नदीच्या काठी
किती रंगल्या अपुल्या भेटी
नंतर उरल्या काजळराती
सुन्या नभातिल सुने चांदणे माझे
तुझ्या स्मृतींचे गंध अजुनही ताजे …तू ये ना


अबोल तरीही होतो बोलत
हात गुंफुनी होतो चालत
आज इथे तू नसता सोबत
चाहुल फसवी , पाचोळयावर वाजे
तुझ्या स्मृतींचे गंध अजुनही ताजे …तू ये ना

भुरभुरणारया वारयावरती
गालावरची बट सावरती
तुझी सावळी मोहक मुर्ती
आठवणींचा , मनात सागर जागे
तुझ्या स्मृतींचे गंध अजुनही ताजे …तू ये ना

Thursday, November 23, 2006



हलतात फक्त ही पाने
वारयाची चाहुल नाही
ह्या पाचोळयावर कोठे
काळाचे पाउल नाही

ही दुपार संथपणाने
काळोख लपेटत आहे
हा दिवस मला जाताना
दाराशी भेटत आहे।


हे दु:ख मला आवडते
शिशिराच्या पानगळीचे
मी उदासवाणे मौन
पांघरतो सांजधुळीचे
----

Wednesday, November 22, 2006


ऐकतो मी हाक माझी , गिरी-दरीतुन परतणारी
मोजतो वाळूतली चिन्हे पदांची उमटणारी

ऐकतो कधी तारकांचे गूज , नीरव मध्यरात्री
ढवळतो प्रतिबींब माझे, कधी नदीच्या संथ पात्री

कोरतो वारयातले सारे शहारे काळजावर
सोडुनी देतो सुगंधी श्वासपक्षी पावसावर



लहरतो, कधी बहरतो, कधी पानझडीचा पळस होतो
कधी विरागी सांजरंगी , मंदिराचा कळस होतो

शोधतो माझीच रूपे , मी सभवती, आसमंती
तेवढयासाठीच माझी जन्म-जन्मांची भ्रमंती
------