Thursday, August 30, 2007


मी जसा भेटतो : गझल


मी जसा भेटतो तसा आहे
आतबाहेर आरसा आहे

होतसे राख जो जळे त्याची
काय आयुष्य कोळसा आहे ?

मी पिढीजात सोसतो दु:खे
वेदनेचाच वारसा आहे

आपुला दोष ना दिसे कोठे
हा तुझा दोष, माणसा, आहे

काय माझ्यात पाहिले तेव्हा
(हा तुझा प्रश्नही कसा आहे?)



Saturday, August 25, 2007


पंढरीची वाट
चालती पाउले
धन्य धन्य बोले
पायधूळ

हजारो मुखांनी
गर्जे पुंडलिक
देवालाही सुख
साह्ववेना

उभा कटेवरी
ठेवूनीया हात
व्याकूळ साक्षात
पांडुरंग

Wednesday, March 28, 2007














गुड माँर्निंग

गुड माँर्निंग म्हणत येते माझ्या दारी सकाळ
तिचे केस भुरभुर उडत झाकीत असतात कपाळ
मोहक तिच्या अस्तित्वाची निरखीत कलाकुसर
चाचपडतच बंद करतो कोनाडयातला गजर

उठतो जोडत मनातल्याच देवापुढती हात
गिझर करतो ओँन यंत्रवत घासत घासत दात
थोरल्याला मग आधी लाडिक , नंतर बाप-स्टाईल
हाक देतो " उठा आता, नाहितर बस जाईल"

दार उघडतो, उजाडलेले असते अंधूक अंधूक
पेपरवाला येतो ऐटीत, फेकतो पेपर अचूक
पदर खोचून येते बायको, बोलू लागतात भांडी
थोरला मागतो टाय, धाकला उठून मागतो मांडी

बस येते , थोरला जातो , धाकला करतो गाई
चहा पीत अंगणात बसतो , दोघेच क्षण काही
शब्दच गुंफतो वेळ नसतोच गुंफायाला बोटे
घडयाळ आपले उगारूनच उभे असते काटे

सकाळ अशी रोजच पण चहा, अंगण, दोघे
याहुन वेग़ळे काय असते कविता करण्याजोगे?

दि। 28 मार्च 2007

Friday, January 12, 2007

आता माणसे घडयाळात बघून हसतात, बोलतात
घडयाळाच्या दोन काटयांच्या कोनातच भेटतात माणसे
खरे तर माणसे भेटतच नाहीत
भेटतात त्यांची घडयाळेच

एवढे असूनही
काळ
आजही येत नाही घडयाळ बघून
देवाशी त्याचे इमान …अजुनही कायम आहे!