Saturday, October 23, 2010

 दिठींचा उत्सव

पाल्यापाचोळ्याखालून जसे झुळझुळे पाणी
किर्र हिरव्या राईत जशी पारव्यांची गाणी
जशी पहाट उन्हाची सोनकोवळी पैंजणे
जसे शारदचंद्राचे दूधकेशरी चांदणे
जसा नितळ नभात फिरे कापसाळी ढग
झडलागल्या दुपारी जसे आळसावे जग
ऐन उन्हाळ्यात जसा ओल्या वाळ्याचा सुवास
जशी हळूवार होई लाट भेटता तटास

तशी तुझी माझी प्रीत दोन दिठींचा उत्सव
फुले फुलती अबोल, उरे पानांवरी दव

Saturday, August 21, 2010


पंख फुटले पिलांना
दिशा धुंडाळती दाही
साद घालते घरटे
त्याला प्रतिसाद नाही

पिले हिंडती मोकाट
घेती पंखात आभाळ
नाही घरट्याची कुठे
सय जराही ओढाळ

पिले कोवळ्या वयात
आता लागली उडाया
त्यांच्या रक्तात रुजेना
वृक्ष वल्लरींची माया

दु:ख घरट्यांना नाही
पिले उडून जाण्याचे
पिले तशीच उडाली
काय करावे गाण्यांचे ?

Tuesday, February 02, 2010


दरवळतो अजुन गंध पारिजातकाचा
अंगणात अजुन बहर कालच्या फुलांचा

अजुन तेच चंद्रप्रहर, त्याच चांदराती
उजळतात अजुन उरी लक्ष लक्ष ज्योती
अजुन कधी स्मरणपथी वादळ ते भेटे
अन क्षणात तनमनात वडवानल पेटे
आठवतो क्षण क्षण ह्या धुंद मीलनाचा
दरवळतो अजुन गंध पारिजातकाचा

दरवळतो अजुन गंध पारिजातकाचा
पण आता राहिला न स्पर्श तो सुखाचा
वठला तो वृक्ष पान पान गळुन गेले
वणव्यातच सर्व रान रान जळुन गेले
उरल्या त्या आठवणी मुग्ध बहरण्याच्या
अन दवात भिजत भिजत हळुच उमलण्याच्या
आसपास होई भास त्याच पावलांचा
दरवळतो अजुन गंध पारिजातकाचा