Friday, December 19, 2008

उखाणा घे पोरी
म्हणतात सारे
उडतात घरभर
हास्याचे फवारे

उखाणा घेताना
डोळा आले पाणी
सनईच्या मांगल्याच्या
मुळाशी विराणी

जुळवून शब्द
घ्यायचेच नाव
आले माझ्या जीवनात
कोणीतरी राव

उखाणा घे पोरी
तुझे तरी काय ?
कुठेतरी निजायची
पाहिजेच सोय

Tuesday, September 02, 2008


पुर्णत्व

कधी पेटवताना निरांजनातिल वाती
किती जपतो आपण, ओंजळ करतो भवती
झुळुकही जराशी थोपवितॊ हाताने
अन घेतॊ काढून, पुर्ण उजळल्यावरती

एकदा उजळली पुर्णत्वाने ज्योती
की नसते तिजला वाऱ्याचीही भीती
ती स्वत: जळते आणि उजळते इतरा
मग तेच जोडतॊ हात , नी लवतो पुढती
. . . . . . . . . . . . . . . . . . . . .

Wednesday, June 04, 2008


निमिषाचे कवी आम्ही , निमिषाचे बुद्ध ।
मग उरे तगमग, जाणविता शुद्ध ।
लौकिकाच्या कोळशात अलैकिक हिरा ।
चकाकतो तेवढाच .. बाकीचा ढिगारा ।
लोक म्हणे तुम्ही कसे धरिला हा पंथ ।
कवी काजव्याचा दिवा . . . सुर्य तिथे संत ।
काजव्याचे क्षणिकत्व किती लपेटावे ?
सुर्य व्हावे ... आता सारे अस्तित्व पेटावे !!

Wednesday, May 21, 2008



पाकळी पाकळी मी. . .
जपणार आता किती ?
तुझ्या स्पर्शांची ओढ मला
तुझ्या स्पर्शांची वाटे भीती !

वाटते की हा गंधकोष माझा . . लुटशील का रे तू ?
भ्रमर हो‌ऊन माझ्याच मिठीत . . मिटशील का रे तू ?
तुझ्या मिटण्याची ओढ मला . . .
तुझ्या लुटण्याची वाटॆ भीती


वाटते की मला वेचून घेशील. . . ऐन पहाटेस तू
दवाचे मोतीही टिपून घेशील . . राजहंस आहेस तू
भय रात्रीचे नाही मला. .
पहाटेचीच वाटे भीती

स्पर्शताच तुझ्या तेजस हातांनी , उमलून ये‌ईन मी
तुझ्यासाठी रात्र सोसली काट्या्त . .तुझीच हो‌ईन मी
फूल होण्याची ओढ मला . . .
कळी नसण्याची वाटे भीती !

पाकळी पाकळी मी . . . . . . . . . . .

Saturday, February 16, 2008


पावसाची पावलं कधी अलगद उमटतात काचेवर
कधी उन्हाची दुपार लवंडलेली सावलीच्या पारावर
कधी शिशिरात पानगळीची धुरकट संध्याकाळ
वसंत फुटून फुलताना कधी गंधमोहोर वाऱयावर

कधी काहीच कुठेच नसल्य़ाची भावहीन शुन्यता अऩ
नेमकी माणसे वाटेत भेटुन हातात हात घेत बोलणारी
सर्वव्यापकतेची क्षणात दिपवून जाणारी अंतर्जाण
तोच ..प्रेतेयात्रा रस्त्यावरून अचानक फुले मागे उधळत जाणारी

काय आहे हे? कळत नाही.. क्षणोक्षणी बदलणारे काहीसे ?
सावल्यांच्या मायाजाळातून जसे हलत रहावेत कवडसे

जगणे इतके अतर्क्य, अगम्य .. अमर्याद.. अनुभवांचे अंतराळ
की कविता लिहिताना ही माझी लेखणीही ब्रह्म होते
शब्द उतरतात थेट कुणा अज्ञात सम्राटाच्या पालखीतून
मी मात्र भोई .. पायांजवळची माझी सही नम्र असते.





Saturday, January 12, 2008


ओळखू नये मज कोणी
मी इतके सरळ जगावे
असुनही ...कुठेच नसावे

गर्दीत असावा मेंदू
मेंदूत नसावी गर्दी
मी एकांताचा दर्दी

अस्तित्व करावे लागे
का सिद्ध, कळे ना मजला
इतरांची सा्क्ष कशाला ?