Friday, May 01, 2009


मौन नाझ्या सोबतीने पाळ्ते
हे शहर माझी व्यथा सांभाळते

ती उखाणा घेत नाही, हासते
हासुनी ती नाव माझे टाळते

मी तिची नि:शब्दताही ऐकतो
पत्र ती घाईत माझे चाळते

लोपले पावित्र्य दीपांचे, पहा!
देशद्रोह्यांना प्रजा ओवाळते


पोळलो मी, भाजलो आजन्म मी
ही चिता आहे बरी की ,जाळते


दु:ख ओलांडून जाती माणसे
कोण येथे व्यर्थ अश्रू ढाळते
?

रात्र भासे ही मला तुजसारखी

चांदणे वेणीत जेव्हा माळते

Tuesday, March 24, 2009


पाहतॊ श्वासात कोठे लागतो काही सुगावा
काल् तू होतीस ह्याचा शोधतो आहे पुरावा

अंगणापर्यंत माझ्या आसवांची रेष जाते
(काय माझा चंद्र गेला ह्याच वाटेने असावा? )

ही दुहेरी रीत एका माणसाला शोभते का ?
"जाउ दे ना" ही म्हणावे हात ही हाती धरावा

तु म्हणालीस "माग ना रे तू, मला सोडून काही"
आरसा बघशील तेव्हा चेहरा माझा दिसावा !

काय अंधारून आले माझीया प्राणांसभोती
भास् आहे की तुझ्या घनदाट छायेचा विसावा ?

लागलॊ जेव्हा जळाया यातना झाल्या न काही
पोसले आजन्म ज्याला , देह हा माझा नसावा

Monday, January 05, 2009



कवी जागोजागी कवी ब्लॉगो ब्लॉगी
कवी वृत्तहीन, कवी ग-ल गा-गी
कवी शिकावू, कवी दिखावू
कवी उबावू कवी विकावू

कवी सम्मेलन वाले , सामाजिक वाले
कवी शबनम वाले, दाढीवाले , ताडी वाले
कवी गाऊन म्हणणेवाले, पेप्रात छापणे वाले
कवी भाषांतरी , कवी कविताच ढापणेवाले

कवी राजकीय, विद्रोही ... संतप्त , आक्रमक काही
कवी शब्दिक गोड गुलाबी श्रुंगारिक मुक्त प्रवाही

कवी उदंड झाले परंतु एखादाच
शब्दात मांडतो सुखदु:खांचा नाच
तो नसून असतो, असून नसल्यावाणी
सम्राट नभाचा. . पृथ्वीवर अनवाणी